कोरोना – ब्रिटनमधील नवीन प्रकार : अफवा आणि सत्य – डॉ प्रकाश कोयाडे ( YCM Hospital Pune )

महाराष्ट्र 14 न्यूज : सध्या ब्रिटनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराबद्दल (New Varient) उलटसुलट चर्चा सुरू आहे. तो आधीच्या विषाणू पेक्षा खूप जास्त वेगाने पसरणारा आणि घातक आहे अशा आशयाच्या बातम्या चहूबाजूंनी येत आहेत. सध्याच्या काळात आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल घाईघाईत व्यक्त होण्याची सवय लागली आहे, सोशल मीडियामुळे तर हे विचार न करता व्यक्त होणं असंख्य अफवांना जन्म घालत असते. त्यामुळे थोडं डोकं शांत ठेवून या कोरोनाच्या नवीन प्रकाराबद्दल विचार करू.

या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचे नाव आहे ‘VUI-202012/01′ म्हणजे ‘First Variation Under Investigation in December 2020’. नाव नवीन आहे, कठीण आहे म्हणजे रोग भयंकर असावाच असं काही नाही आणि कोरोनाचा नवीन प्रकार हा पहिल्यांदाच सापडला असंही काही नाही. गेल्या वर्षभरात कोरोनाचे कितीतरी वेगवेगळे प्रकार समोर आलेले आहेत. मुळात कोणताही विषाणू एका ठराविक कालावधीनंतर स्वत:ची रोग निर्माण करण्याची तसेच वाढविण्याची ताकद कमी करतो घेतो कारण त्यालाही त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. हळूहळू तो मानवी किंवा इतर प्राण्यांच्या शरीरासोबत जुळवून घेतो. मधल्या काळात अचानक केसेस कमी होण्याचं हेसुद्धा एक महत्त्वाचं कारण असावं.विषाणूचा एक प्रकार स्थिर होईपर्यंत त्याचा दुसरा प्रकार तयार होणं यात नवीन काही नाही. आफ्रिकेमध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळला आहे ज्याचं नाव ‘501.V2’ आहे, तो प्राथमिक अवस्थेत असून त्याची अजून कुठेही चर्चा नाही. मग या ब्रिटनमधील प्रकाराबद्दल एवढी चर्चा होण्याचं कारण काय? सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार आढळला, जवळपास २६ टक्के केसेसमध्ये नवीन प्रकार दिसून आला. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ही टक्केवारी ६० पर्यंत पोचली आहे. त्यामुळे एका निष्कार्षापर्यंत पोचता येईल की कोरोनाचा हा प्रकार प्रचंड वेगाने पसरत आहे.

तो वेगाने पसरतोय म्हणजे भयंकर घातक असणार असं काही नाही, ब्रिटनमध्ये या नवीन विषाणूमुळे बाधित झालेल्या १००० रूग्णांपैकी ४ मृत्यू झालेले आहेत जे मुळ विषाणू पेक्षाही कमी आहे, अर्थात प्रत्येक जीव महत्त्वाचा असतोच!
याठिकाणी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पहिली म्हणजे हा कोरोनाचा नवीन प्रकार जरी वेगाने पसरत असला तरी आधीच्या विषाणूपेक्षा घातक, धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा अजून समोर आलेला नाही. दुसरी गोष्ट, या विषाणूची रोग निर्माण करण्याची आणि रोग वाढविण्याची क्षमता जुन्या विषाणूएवढीच आहे, त्यात जास्त काही फरक नाही. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, लसीकरणावर या विषाणूच्या प्रकाराचा काहीही फरक पडणार नाही, निघालेली लस या नवीन प्रकारावर तेवढीच परिणामकारक असेल. एकंदरीत काय तर पॅनिक होण्याची, घाबरून जाण्याची काहीच गरज नाही.

केवळ ब्रिटनमध्येच नाही तर अॉस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, बेल्जियम, डेन्मार्कमध्येही विषाणूचा हा नवीन प्रकार आढळला आहे. सध्यातरी केवळ ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे तसेच मध्यपूर्वेतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन वगैरे करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, कितीही काळजी घेतली तरी हा कोरोनाचा नवीन प्रकार भारतामध्ये येणारच. गेल्या वर्षभरातील नियोजन पाहता कुठे न कुठे तरी आपण कमी पडणार आणि या विषाणूच्या प्रकाराला भारतात शिरण्याची संधी मिळणार हे मात्र नक्की. विमानतळावरच योग्य ती काळजी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय राहिल. बाकी ते रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी करणे यापाठीमागचे लॉजिक काही समजले नाही. म्हणजे कोरोना येऊन वर्ष होत आलं तरी अजूनही आपण काहीच शिकलो नाही असा अर्थ होतो. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हा काही ‘निशाचर विषाणू’ नाही जो फक्त रात्रीच पसरतो. हा संचारबंदीचा निर्णय चुकीचा आहे. असो..‌. लेखाचा विषय वेगळा आहे त्यामुळे ही चर्चा नकोच.

हा नवीन प्रकार किती घातक आहे याबद्दल अजून ठोस निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे आता ‘काय होणार’ म्हणून घाबरून जाणंही चुकीचं आणि ‘काही होणार नाही’ म्हणून बिनधास्त राहाणंही चुकीचंच. हलगर्जीपणा चालणार नाही कारण याचा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार लहान मुलांमध्ये पसरण्याचे प्रमाण आधीपेक्षा थोडे जास्त आहे. गेल्या वर्षभरात आपण जवळच्या खूप लोकांना गमावलं आहे, प्रत्येकाचं कोणी न कोणी सोडून गेलं आहे. आता आणखी हे आप्तेष्टांचं सोडून जाणं आपल्याला परवडणारं नाही तेव्हा काळजी घ्या. आपल्याला फार काही मोठा डोंगर उचलायचा नाही… फक्त वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यायची आहे, काय करायचं हे प्रत्येकालाच माहिती आहे! २०२१ मध्ये असं काही घडू नये की त्यावेळी आपल्याला पश्चात्ताप होईल आणि वाटेल की, २०२० मध्येच योग्य ती काळजी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती!

डॉ. प्रकाश कोयाडे
(YCM Hospital, Pune)

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

11 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 day ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 day ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

6 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago