महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील दीड वर्षापासूनच वाद अखेर संपुष्टात आला. संस्थेचे मे. धर्मादाय आयुक्त कार्यालय दप्तरी सन १९९१ पासून चे चेंज रिपोर्ट सादर करणे प्रलंबित होते. मागील वर्षी अध्यक्ष सुरेश तावरे व विश्वस्त भगवान गोडसे यांनी मे. धर्मादाय आयुक्त, पुणे यांचेकडून विनामूल्य स्कीम मंजूर करून घेतली व संस्थेचे सर्व कामकाज धर्मादाय कार्यालय दप्तरी अद्ययावत करून घेतले.
दरम्यान काही समाज बांधवांनी गैर समाजातून सदरच्या मंजूर स्कीम ला मे. धर्मादाय कोर्टात हरकत घेत विश्वस्तां विरोधात दावा दाखल केला होता. त्यानंतर समाज बांधवांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. संस्थेचे सुरळीत चाललेले कामकाज विस्कळीत झाले होते. सदरचा वाद मिटवण्यासाठी समाजातील जेष्ठ बांधवांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. परंतु विश्वस्त व हरकतीचा दावा करणारे समाज बांधव यांनी संयुक्त बैठक घेऊन संस्थेची होणारी बदनामी, खुंटलेली प्रगती, समाजातील अस्थिर वातावरण इत्यादी गोष्टींचा विचार करत सदरचा वाद संपविण्याचा निर्णय घेतला, झालेले आरोप प्रत्यारोप मागे घेत येणाऱ्या काळात एक विचाराने संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने काम करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.यावेळी सुरेश तावरे व दत्ता ढगे यांची एकी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांनीही भविष्यात समाजासाठी एकत्र येत सर्वमिळून कार्य करण्याचे जाहीर केले.

मे. धर्मादाय आयुक्त कोर्टातील मंजूर स्कीम विरोधातील दावा ही यावेळी मागे घेण्यात आला. देवांग कोष्टी समाज, पुणे या संस्थेतील प्रलंबित वाद संपुष्टात आल्याने राज्य भरातून याचे कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश तावरे यांनी सर्वांचे आभार मानले व प्रति वर्षी प्रमाणे येणाऱ्या १५ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता वार्षिक सर्व साधारण सभेची घोषणा करत सर्व समाज बांधवांना सभेला येण्याचे आवाहन केले आहे.
समाजातील वादावर सामोपचार बैठकीत चर्चेकरिता श्री. सुरेश तावरे, दत्ता ढगे, भगवान गोडसे, सुनील ढगे, मनील ढगे, श्री. आमने व सतीश लिपारे आदी मान्यवर उपस्थित होते.


