Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड मनपाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न

*ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*

*पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ-उपमुख्यमंत्री*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) :- आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे. नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

*सांडपाण्यावर प्रक्रीया करा*
पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल. प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

*भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड*
भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

*नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली*
गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून श्री.फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे. हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

कामे गतीने पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या उद्योगधंद्यासोबत लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्याच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने शहरात कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयावर प्रशासन काम करीत असून ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या गतीमानतेसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, पुढील ३० वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील. मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेसाठी ३१२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ग.दि.माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील कुटुंब सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, पीएमआरडीए आयुक्त राजीव महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सुमीत्र माडगूळकर आणि माडगूळकर कुटुंबिय आदी उपस्थित होते.

*अकरा विविध विकासकामांचे उद्घाटन*
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात निघोजे एमआडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस व इतर प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी व नेहरूनगर येथील शाळा इमारत, मोशी येथील उप अग्निशमन केंद्र (सब फायर स्टेशन), रावेत येथील सेक्टर ३२ए मधील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतूकीकरण पुरवठा विभाग, चिंचवड येथील क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल व वीर सावरकर उद्यानातील लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

*विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उपक्रमांचा शुभारंभ*
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलचे काम, डेअरी फार्म येथील पूलाचे काम, मोशी, डुडूळगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत, चोविसावाडी येथील नवीन अग्निशमन केंद्र उभारणे, गवळीमाथा व कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रीया केंद्र, पॅकेज ३ अंतर्गत भोसरी विभागातील धावडे वस्ती येथील पाण्याची टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. मनपा हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण, मालमत्तांची सुधारीत कर आकारणी, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे आणि दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

*चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन*
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि २०३१ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन चिखली येथे ३०० द.ल. लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजित असून त्यातील पहिल्या टप्प्यात १०० द.ल. लिटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

23 hours ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 days ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 days ago

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप अकॅशन मोडवर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…

2 weeks ago

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

2 weeks ago