महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सशस्त्र सेना (आर्म फोर्स मेडिकल कॉलेज ) वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयात इंटेन्सिफाईड अवेअरनेस कॅम्पेन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही/एड्स जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून औंध पुणे येथे येथील शिवाजी महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना या विषयावर चर्चासत्र आणि जनजागृती चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ‘आयसीटीसी’च्या समन्वयक सौ अपर्णा कदम यांनी विद्यार्थ्यांना एड्स या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स होण्याची कारणे, त्याचा संसर्ग कसा होतो, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या उपचार सुविधा यांची माहिती दिली. एड्स संदर्भात समाजामध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत अपर्णा कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये योग्य ज्ञान रुजल्यास भविष्यात एड्सचा धोका कमी करता येईल, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


