महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑक्टोबर) : राज्यात अनेक महापुरुषांनी शिक्षण क्षेत्रात काम करत शिक्षणाची गंगा गोरगरिबांपर्यंत पोहोचवली आहे. सरकार शिक्षणासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटींची तरतूद करते. मात्र, अलीकडील काळात ट्यूशन क्लासेसमुळे (Tuition Classes) शाळा ओस पडू लागल्या आहेत. नव्या शिक्षण धोरणात आमूलाग्र बदल होणार असून, ट्यूशन क्लासेसचे दुकानच बंद होणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
दहावी आणि बारावीसाठी 50 टक्के गुण व बाकीचे गुण सीईटीद्वारे ठेवायचे असे केले तर या ऍकॅडमींना आळा बसेल. पुढील वर्षी आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणार आहोत. यामध्ये मत-मतांतरे आहेत. काहीजण म्हणतात की वैद्यकीय शिक्षण सुद्धा मातृभाषेत दिले पाहिजे. परंतु जगाने मान्य केलेल्या इंग्रजी भाषेतच हे शिक्षण असावे असे माझे मत आहे. डॉक्टर, इंजिनिअर असलेल्या व्यक्तीला इंग्रजी आले नाही तर काय होईल हे मी सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
कंत्राटी भरतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सही केली
राज्य सरकार विविध विभागात दीड लाख पदांची भरती करत आहे. कंत्राटी भरतीवर मागील मुख्यमंत्र्यांनी सही केली होती. पण ती भरती कोरोना काळापुरती मर्यादित होती, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत. तेथे निवृत्त शिक्षकांना घेत आहोत. नवीन भरती झाल्यावर त्यांना कमी केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.