महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जुलै) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. आता राष्ट्रवादीत सर्वाधिक समर्थक कुणाचे याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. मुंबईत आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांना पाठिंबा दिला आहे. चलो मुंबई म्हणत, शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आज (दि.०५) सकाळी चलो मुंबई म्हणत, मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आज (बुधवार दि.५ जुलै) मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर अजित पवार गटाने वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.
अजितदादा पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, राहुल भोसले,माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, शिवाजी पाडुळे, फजल शेख, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, इखलास सय्यद, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत.