महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑगस्ट) : राज्यातील सत्तांनाट्यानंतर तब्बल ६५ दिवसांच्या कालखंडाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (दि. २६) बारामतीत येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
याच दिवशी अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली व एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले. या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार हे प्रथमच बारामती येत आहेत. त्यांचा नागरी सत्कार होत असल्यामुळे या नागरी सत्काराला उत्तर देताना अजित पवार आपल्या मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात, याबाबत कमानीचे ओ त्सुक्य आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच बारामती दौरा असल्यामुळे बारामतीकरामध्ये देखील याबाबत कमालीचे उत्सुकता आहे. एरवी दर शनिवारी बारामतीत विविध विकास कामांच्या पाहणी निमित्त येणाऱ्या अजित पवारांनी गेले अडीच महिने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीला येणे कमी केले होते. त्यामुळे आता प्रदीर्घ कालावधीनंतर अजित पवार बारामतीत असल्यामुळे त्यांच्य सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी केली आहे.
बारामती येथील कर्सब्यातील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून नंतर शारदा प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.