Categories: Uncategorized

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात गुरुवर्य कुऱ्हेकर महाराजांच्या कीर्तनाने झाली.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होत आहे. या पारायण सोहळ्यासाठी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

वारकरी संप्रदायातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे कुऱ्हेकर बाबा होत.

जे ज्ञानगंगे नाहाले |  पूर्णता जेवून झाले |

जे शांतीसी आले | पालव नवे ||

असे ज्यांचे वर्णन करता येईल असे कुऱ्हेकर बाबांनी

तुकाराम तुकाराम |

नाम घेता कापे यम ||

या रामेश्वर भट्टांच्या स्तुती पर अभंगावर कीर्तन केले. वयाच्या शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या बाबांचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी होता . ज्यांनी तुकोबारायांना सुरुवातीला त्रास दिला,  असे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट यांना अनुभूती आल्यानंतर ते तुकोबारायांचे नि:सिम भक्त झाले व त्यांचे स्तुती पर अनेक अभंग लिहिले,  आरती लिहिली.तुकाराम या शब्दातील सामर्थ्य एवढे आहे की प्रत्यक्ष यमही भीतीने कापतो. तुकाराम या केवळ नामस्मरणाने आपली जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. तुकोबांच्या पुरुषार्थाने दगडा सहित अभंगाच्या वह्या तरल्या आणि  आजही त्या अभंग गाथावर अवघी मानवजात करत आहे. संत तुकाराम महाराज हे प्रत्यक्ष विष्णूचे, पांडुरंगाचेच अवतार आहेत. ते त्यांच्याहून भिन्न नाहीत. ते एकच आहेत.

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |

तुका विष्णू नोहे दुजा ||

वैदिक अद्वैत तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप म्हणजे तुकोबाराय आहेत,असे बाबांनी सांगितले.

कीर्तनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता या सोहळ्यातून खऱ्या अर्थाने तुकोबा यांच्या अध्यात्मिक श्रीमंतीची अनुभूती आली.

 

भावाचा भुकेला भगवंत

गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्यामध्ये रविवारी (९ मार्च) सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्त परायण रवींद्र महाराज ढोरे यांचे कीर्तन संपन्न झाले.

पाहुणे घरासी |  आजी आले ऋषिकेशी ||

काय करू उपचार |  कोंप मोडकी जर्जर ||

दरदरीत पाण्या |  माजीं रांधीयेल्या कण्या ||

घरी मोडकिया बाज | वरी वाकळांच्या शेजा ||

मुखशुद्धी तुळशी दळ | तुका म्हणे मी दुर्बळ ||

 

या अभंगावर हरिभक्त परायण रवींद्र महाराज ढोरे यांनी कीर्तन केले. भक्ताला देवाची आठवण येणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु देवाला भक्ताची आठवण येणे ही खरंच महान भगवंत भक्ताची लक्षणे आहेत. देवाला तुकोबारायांची आठवण आली. त्यांनी गरुडाला तुकोबारायांकडे  पाठवले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, की ज्या आसनावरती माझे स्वामी बसतात, तेथे मी बसू शकत नाही. गरुड परत वैकुंठाला गेले. भगवान परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांना म्हणाले, आता मीच तुकोबांना वैकुंठ गमनाची तारीख, वेळ ठरवण्यासाठी जातो आहे. म्हणून फाल्गुन शुद्ध दशमी म्हणजे आजच्या दिवशी वैकुंठातील ऋषिकेश भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले.

परंतु घरी आल्यानंतर त्यांचा पाहुणचार कसा करावा?  याची काहीच व्यवस्था तुकोबारायांच्या  घरी नव्हती. म्हणून तुकोबारायांनी भगवंतांना आपल्या मोडून जर्जर झालेल्या खोपट्यामध्ये बसविले आणि पाण्यामध्ये शिजवून कण्या खाऊ घातल्या. पाच हजार वर्षांपूर्वी विदुराच्या घरी कण्या खाल्ल्यानंतर परत देवाला कण्या मिळाल्या त्या तुकोबांच्या घरी.

घरी मोडकी बाज होती त्याच्यावर वाकळ टाकून देवाला बसवले आणि मुखशुद्धीसाठी पानाचा विडा न देता तुळशीपत्र देऊन भगवंताला तृप्त केले. भगवंत हा भावाचा भुकेला असतो आणि म्हणून तुकोबारायांसारख्या भक्ताच्या घरी देव आनंदाने कण्या प्रसाद खातो. म्हणून आजच्या या तिथीला कण्या दशमी म्हणतात.

 

उद्याचे कीर्तन

१० मार्च – हभप सागर महाराज शिर्के (स. ११), हभप पोपट महाराज कासारखेडेकर (सायं. ६) हे उद्या कीर्तनसेवा सादर करणार आहेत. 

जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान, घोरावडेश्वर डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वारकरी संप्रदाय यांचा संयोजनात सहभाग होता.

……

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…

2 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद! ….- अवघ्या तीन दिवसांत ३५,००० हून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय…

5 days ago

पिंपरी चिंचवड शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे स्वीकारले सदस्यत्व

शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…

5 days ago