Google Ad
Uncategorized

शक्तिप्रदर्शन नव्हे ही तर महाविजयाची पूर्वतयारी; महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांच्या भावना

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ ऑक्टोबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर  केला.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे हे उपस्थित होते.

Google Ad

लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. सुवासिनींचे औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजर आणि ‘अबकी बार, शंकरभाऊ आमदार’, ‘आले रे आले, कमळ आले’, ‘अमर रहे, अमर रहे, लक्ष्मणभाऊ अमर रहे’, अशा घोषणा देत भव्य दिव्य अशी पदयात्रा पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमार्गे रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे तापकीर चौक मार्गे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

या पदयात्रेला सुमारे ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून तसेच घरांच्या छतावरून नागरिकांनी शंकर जगताप यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी केली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त उत्साह आणि पदयात्रेला उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी पाहून ही पदयात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयी यात्रेची पूर्वतयारी असल्याची भावना, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अर्ज भरल्यानंतर शंकर जगताप यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचवड विधानसभेतील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला अशीच मनापासून साथ आणि  आशीर्वाद द्या, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले.ad
———————————————————–
शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, राजेंद्र जगताप व राम वाकडकर पदयात्रेत सामील

मागील काही दिवसांपासून ज्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती ते भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी या पदयात्रेत सहभागी होत आम्ही शंकर जगताप यांच्यासोबत असून त्यांना मताधिक्याने आमदार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

——————————————————-
थेरगाव येथील शनी मंदिरात गोपूजन करत साधला ‘वसुबारस’ योग!

पदयात्रेदरम्यान थेरगाव येथील शनी मंदिरात असलेल्या गोमातेचे पूजन शंकर जगताप यांनी केले. त्यामुळे अर्ज भरण्याआधी आजचा वसुबारसचा योग साधला गेला. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संजय गायखे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी जगताप यांच्या विजयासाठी शनिमंदिरात महायज्ञ केला.ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!