महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी २०२३) : आज दि.१२ जानेवारी रोजी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पंढरपूर चे अध्यक्ष सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रवचन रुपी सेवा होती, यात महाराजांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजसेवेचे अविरत कार्य करीताना आपल्या धर्मासाठी खूप मोठी दानधर्माची सेवाही केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास दीड कोटी रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने वाहण्यात आली, याप्रसंगी दीड कोटी रुपये भाऊंच्या स्मरणार्थ भंडारा डोंगर येथे होणाऱ्या मंदिरासाठी विजय जगताप, शंकर जगताप, त्यांच्या भगिनी, नातेवाईक, कार्यकर्ते, नगरसेवक यांनी अध्यक्ष बाळासाहेब काशीद देहू, आळंदी संस्थान यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले, आणि अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे …
आज यावेळी उपस्थित असलेल्या जनसागरावरून त्यांच्यावर जनतेचे, गोरगरिबांविषयी असणारे प्रेम दिसून येत होते. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पंढरपूर चे अध्यक्ष सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, नगरसेवक शशिकांत कदम, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, शहर संघ चालक विनोदजी बन्सल, दादा वेदक, आमदार सुनील टिंगरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप, ह भ प आचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज, ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार विलास लांडे यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसत होते.
स्वतःच्या मृत्यूची कल्पना असतानाही जनतेची सेवा करणारा ‘लक्ष्मण’ मी अनुभवला ….
ह भ प पंकज महाराज गावडे
नात्याच्या पलीकडे मैत्री जपणारा एक विकासपुरुष हरपला, तीन पिढ्यांचे नाते असणारे हे आमचे घर, अनेक सहकाऱ्याना मोठं करणारा हा लक्ष्मणभाऊ , सामाजिक चळवळ उभे करणारा भाऊ … शब्दाची किंमत ठेवणारे आणि देणारे भाऊ … त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
विलास लांडे (माजी आमदार)