महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मार्च) : पिंपळे गुरव येथील गजानन नगर मधील एका सात वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने मुलाच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला. त्यात बालक जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. १८) घडली.
जियान त्रिवेदी (वय ७ वर्षे) असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. राहत्या इमारतीच्या समोर मित्रांसोबत रात्री आठच्या सुमारास खेळत असताना एका कुत्र्याने त्या बालकावर हल्ला केला. नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने सुदैवाने या बालकाची सुटका झाली. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला औंध जिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचारासाठी पाठविण्यात आले आहे. भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की, कुत्र्याने त्या बालकाच्या हाताचे लचके तोडले आहेत.
याआधी अनेक जणांना येथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. वारंवार महापालिकेच्या कुत्री पकडणाऱ्या अधिकाऱ्यांना याबत तक्रार केली. मात्र अधिकारी सतत वेळोवेळी केराची टोपली येथील नागरिकांना दाखवीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. आणखी किती जणांचे जीव घेणार आहात? एकदाचे सांगून टाकावे. एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे लक्ष केंद्रित करणार आहात का? असा सवाल येथील जखमी जियानची आई स्नेहल त्रिवेदी तसेच परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दि.१८ मार्च रोजी पिंपळे गुरवच्या जिजामाता उद्यानात नागरिकांबरोबरच भटकी कुत्री ही घेतात फिरण्याचा आणि व्यायामाचा आनंद … उद्यान नक्की कोणासाठी? ही बातमी ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ ने आणि इतर वृत्तपत्रांनी दिली होती, त्याची दखल पशुवैद्यकीय विभागाकडून घेण्यात आली.
या घटनेमुळे परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी अरुण दगडे यांनी सांगितले की, ही घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात संबंधित पथकास सांगण्यात आले. त्यानंतर ज्या कुत्र्याने चावा घेतला तो कुत्रा पशु वैद्यकीय विभागाच्या पथकाकडून पकडण्यात यश आले आहे. नागरिकांनी उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नये. त्यावर ही भटकी कुत्री जगतात. तसेच, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम राबवली जात आहे.