महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक २९ जून २०२३) : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात जुनी सांगवी पवार नगर येथील उत्कर्षा प्ले स्कूल अँड डे केअरमधील चिमुकल्यांचा विलोभनीय दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापिका सौ.मनिषा राहुल पाटील यांनी श्री विठलाच्या प्रतिमेचे आणि पालखीचे पूजन केले.तसेच वारीचे महत्त्व त्यांनी मुलांना समजावले.
विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत यावेळी शाळेच्या या ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. अन् अवघी उत्कर्षा प्ले स्कूल अँड डे केअर दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. ‘जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीची’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे शिक्षण व कर्मचारी यांनी गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण निर्माण केले.
पारंपरिक पोशाख परिधान करून विठ्ठल नामाचा गजर करीत चिमुकल्यांची पायी वारी काढण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले.तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.