महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीकडून ६ गुन्हे उघडकीस आणले असून २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, दापोडी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, भोसरी, दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक- एक घरफोडी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

सराईत गुन्हेगार जयंत याच्यावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत. इतर ५३ गुन्हे दाखल असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. आता सहा गुन्हे उघडकीस आले असून एकूण १०३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज कलगुटगे, पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, पोलिस उपनिरीक्षक सुरेश हिंगे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलिस फौजदार निशांत काळे, पोलीस हवालदार प्रमोद गोडे, पोलिस अंमलदार विजय पाटील, सहाय्यक पोलिस फौजदार एस. आर. वाघुले, पोलिस हवालदार शैलेश काळभोर या पथकाने केली आहे.


