महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून पडल्याचा घटना नुकतीच घडली आहे, 15 दिवसापूर्वी या जेष्ठ महिलेच्या पाठीमागे कुत्रे लागल्यामुळे घाबरून गाडीवरून पडून गंभीर रित्या जखमी झालेल्या आहेत आणि त्या अजूनही ICU मध्ये आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या कडून वारंवार होत आहे.
दिल्लीतील एका लहान मुलीला भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्याचे वृत्त वाचून सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलैला स्वतःहून या प्रकरणी खटला दाखल करून घेतला. यापूर्वीच्या आदेशात भटक्या कुत्र्यांना हटवून निवारा केंद्रांमध्ये बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाबाबत प्राणिप्रेमींच्या नाराजीची दखल घेत, न्यायालयाने या प्रकरणी नव्या खंडपीठाची स्थापना करत, आधीच्या आदेशांमध्ये सुधारणा केली. निर्बीजीकरण, लसीकरण व जंतुनाशक औषधे दिल्यानंतर निवारा केंद्रातील भटक्या कुत्र्यांना सोडून द्यावे, असे आदेश दिले.

या सुविधा पिंपरी चिंचवड मनपामध्ये निर्माण केव्हा होणार, हे ठाऊक नाही. त्याबाबत यंत्रणांना कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. तोपर्यंत भटक्या कुत्र्यांचे संकट कायम राहू शकते, एवढे मात्र नक्की…
तसेच रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांना खायला देण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे निर्देशही दिले गेले; पण या निर्देशांचे पालन होत आहे की नाही, हे कोण पाहणार? पाळीव कुत्र्यांच्या प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे पसरवल्या जाणार्या अस्वच्छतेला जबाबदार कोण? त्याबाबत कोणतेही नियम नाहीत व असल्यास, त्यांचे पालन होताना दिसत नाही, हे वास्तव आहे. प्राणिदया दाखवताना माणसांचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाचे व्यवस्थापन आणि नियोजन करताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यासंबंधीचे नियम आणि कायदे सुस्त यंत्रणादी कागदावर ठेवल्याने या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे.
या भूतलावर माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. पशुपक्षी माणसावर प्रेम करतात, त्याचप्रमाणे असंख्य माणसेही जनावरांना माणसासारखे वागवत असल्याचे पाहायला मिळते. पण, त्याचवेळी मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागते.
भटकी कुत्री ही पिंपरी चिंचवडच्या शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यांत असंख्य लोक जखमी, तर काहीवेळा लहान मुले मृत्युमुखी पडली. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव असलेल्या भागांतून लोकांना जीव मुठीत धरून जावे लागते. नवी सांगवीतील कृष्णा नगर तसेच आजूबाजूच्या परिसरात याचा अनुभव वारंवार येतो.


