महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑक्टोबर) : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच त्याला त्यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं आहे.
मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. त्यावरून आता अजित पवार गटातील नेत्यांनी यावर शंका उपस्थितीत केल्या आहेत.
मॅडम कमिशनर या रविवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात बोरवणकरांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मीरा बोरवणकर यांनी या पुस्तकात असं म्हटलं आहे की, पुण्याच्या येरवडा तुरूंगाजवळील पोलिस दलाच्या ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन दादा पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला होता. लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले. पण मी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला होता. यातच या प्रकरणावरून मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी माझा कोणत्याही प्रकारचा कसलाच संबंध नाही. जमिनीच्या अशा कोणत्याच लिलावत माझा कधीच सहभाग नव्हता. उलट माझी भूमिका ही अशा प्रकारे सरकारी जमिनींच्या लिलावाच्या विरोधाचीच असते, असं म्हणत अजित पवारांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच कितीही दबाव आला तरी अशा प्रकरणात मी कायम सरकारचीची बाजू घेतलेली आहे. शिवाय पालकमंत्र्यांना जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकारही नसतो. अशा पद्धतीने आपण सरकारी जमिनी विकू शकत नाही. याबाब महसुल विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात यावर अंतिम निर्णय केला जातो. असंही त्यांनी म्हटले आहे.