Google Ad
Uncategorized

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमाचे चिंचवड येथे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ ऑगस्ट) : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नावनोंदणी करण्यात येणार असून उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधार नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड वितरण, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, जाती प्रमाणपत्र आदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहेत. योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Google Ad

पिंपरी चिचंवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तसेच पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणासाठीच्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने मानसिक आरोग्य, संसर्गजन्य आजार कार्यक्रम, व्यसनमुक्ती समुपदेशन, मोतीबिंदू निदान, नेत्र तपासणीबाबतचे स्टॉल लावण्यात येणार असून योग शिबीरही आयोजित करण्यात येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात येणार आहे.

दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदी महामंडळांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना, अनुदान योजनांसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेणे, प्रस्ताव तयार करण्यासाठी दिव्यांग बांधवांना मदत करण्यात येणार आहे.‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वितरणही करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!