महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ ऑगस्ट २०२३) : महानगरपालिकेच्या दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जास्तीत जास्त उत्तम सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून त्या अनुषंगाने लोकोपयोगी अनेक योजना महापालिका राबवित आहे. यमुनानगर रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन नवीन बाह्यरूग्ण विभागाचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आणि टाटा ब्लुस्कोप कंपनीच्या सौजन्याने यमुनानगर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पण कार्यक्रमास माजी नगरसदस्य सचिन चिखले, उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, टाटा ब्लुस्कोप कंपनीचे रतन अजय, सी. आर. कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, बाळासाहेब रोकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यमुनानगर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नासिर अलवी, डॉ. संध्या भोईर, आदी उपस्थित होते.
फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर, सेक्टर क्र. १३ मध्ये महानगरपालिकेचे रुग्णालय आहे. सदर ठिकाणी नव्याने रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी अडचण येत असल्यामुळे तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी स्थापत्य विभागामार्फत जोत्यापर्यंतचे बांधकाम करण्यात आले होते, सदर जोत्यावरील स्ट्रक्चर टाटा ब्लुस्कोप कंपनीकडून सीएसआरच्या माध्यमातून प्रिफेब्रिकेटेड क्लिनीक स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे.
महत्वाचे मुद्दे-
• बाह्य रुग्ण विभागाच्या शेडकरिता आयसोलेटेड फुटिंग करून पाया तयार करण्यात आला असून आर. सी. सी. जोत्यापर्यंतचे बांधकाम करून त्यावर टाटा ब्लुस्कोप कंपनीकडून प्रिफेब्रीकेटेड शेड उभारण्यात आली आहे.
• बाह्य रुग्ण विभागाच्या शेडकरिता पीसीसी फ्लोरिंग करून टाईल्स बसविण्यात आल्या आहेत.
• बाह्य रुग्ण विभागाच्या शेडमध्ये अंतर्गत पार्टीशन करण्यात आले आहे.
• बाह्यरुग्ण विभागाच्या शेडसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी, बेसिन तसेच नळ बसविण्यात आले आहेत.
• बाह्य रुग्ण विभागामधील प्रयोगशाळेत ग्रेनाईट टाकून मशिनरी ठेवण्याकरिता ओटा तयार करण्यात आला आहे.
• बाह्यरुग्ण विभागाच्या शेडच्या समोरील बाजूस आर.सी.सी. बांधकाम करून ओटा तयार करण्यात आला असून स्ट्रक्चरल स्टीलचे शेड बांधण्यात आले आहेत.
• बाह्यरुग्ण विभागाच्या रुग्णाकरिता शौचालय बांधण्यात आले आहे.
• जनरेटर तसेच विद्युत विभागाच्या साहित्याकरिता रूम बांधण्यात आली आहे.
• बाह्य रुग्ण विभाग शेडच्या समोरील बाजूस हॉस्पिटलच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टोर्म वॉटर लाईन टाकण्यात आली असून शेडच्या मागील बाजूस ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे.
• बाह्यरुग्ण विभाग असलेल्या शेडच्या समोरील बाजूस कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे.
• जुन्या हॉस्पिटलच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेले ऑपरेशन थिएटर स्थलांतरित करून खाली तळमजल्यावर करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सी. एस. आर माध्यमातून विविध कंपन्या महापालिकेस वेळोवेळी सहकार्य करत असतात, टाटा ब्लुस्कोप कंपनी महापालिकेस विविध कामांसाठी वेळोवेळी सहकार्य करत असते, असे सांगून सदर कामासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी, सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार यमुनानगर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नासिर अलवी यांनी मानले.