महाराष्ट्र 14 न्यूज,जुलै २०२३:- डासोत्पत्ती ठिकाणांची शोधमोहीम तीव्र करून डेंग्यू आजार नियंत्रित करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करा. वारंवार सूचना देऊनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणा-या आस्थापना, बांधकाम साईट, गृह सोसायट्या, दुकाने आणि घरांची तपासणी करून अशी ठिकाणे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या आणि करावयाच्या उपाय योजने बाबत महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत डेंग्यू नियंत्रण मोहीम आणि उपाय योजनेची माहिती त्यांनी घेतली. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधितांना दिल्या, यावेळी ते बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे आदींसह सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करा. अधिक पथके नेमून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करून डासोत्पत्ती करणाऱ्या ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र करा.
पथकांमध्ये आवश्यक मनुष्यबळ वाढवून शहरातील औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह विविध भागांची नियमितपणे तपासणी करा. जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रभाग स्तरावर बैठक घेऊन डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत माहिती द्यावी अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शहरालगतच्या आळंदी, चऱ्होली खुर्द आणि केडगाव अशा काही गावांमध्ये डोळे येण्याची साथ पसरली आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या अनुषंगाने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी तात्काळ उपाय योजना करा, विशेष पथक तयार करून आरोग्य तपासणी मोहीम राबवा, विद्यार्थी तसेच पालकांना आजाराविषयी माहिती देऊन कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.