महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ मे) : केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या कामाला लागल्याचं वृत्त दैनिक ‘सामना’त देण्यात आलं आहे. या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे राज्यातील राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सुद्धा कामाला लागले आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये.
मुख्य निवडणूक आयुक्त देशपांडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेण्यावर भर दिला आहे. तहसीलदार आणि प्रांतअधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच त्यांनी केलेल्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे. मतदान कसे वाढेल? संवेदनशील मतदारसंघ किती? लोकसंख्या किती वाढली? आदी बाबींचा आढावा घेतला जात आहे. यावरून लोकसभेसह राज्य विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्काही वाढवण्यात येत आहे. त्यासाठी मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यात प्रत्येक कॉलेजात मतदार नोंदणी होणार आहे. यंदा मार्च ते जून या चार महिन्यातही नोंदणी करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने तर निवडणुकीच्या तयारीकडे सर्वाधिक लक्ष दिलं आहे. या दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्ये, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. तर शिवसेनेकडून सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज्यभर दौरे केले आहेत. तसेच महाविकास आघाडीनेही वज्रमूठ सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे.