महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे २०२३) :- पावसाळ्याच्या आधीचा कालावधी बियाणे गोळे (सीडबॉल्स) बनविण्यासाठी योग्य वेळ समजली जाते, पर्यावरण संवर्धन तसेच पिंपरी चिंचवड शहरात वृक्षारोपण हा आजच्या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अधिनियम १९७५ अन्वये महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन करण्यात येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, त्या अनुषंगाने आज नेहरूनगर गुलाब पुष्प उद्यान येथे पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान वृक्ष संवर्धन विभाग व उदयन शालिनी फेलोशीप प्रोग्राम (सामाजिक संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे बनवणेबाबत कार्यशाळा घेण्यात आलेली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना उप आयुक्त रविकिरण घोडके बोलत होते.
आजच्या कार्यशाळेत ६५ जणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. आंबा फणस, जांभूळ,चिंच या विविध देशी वृक्षांच्या बियांपासून बियाणे गोळे (सीडबॉल्स) बनवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा हिंगे यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे विभाग प्रमुख रविकिरण घोडके यांनी विद्यार्थिनींना पर्यावरण विषयक मार्गदर्शन केले, तसेच उद्यान विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबतची माहिती दिली. उदयन शालिनी फेलोशिप प्रोग्रॅम यांच्या वरिष्ठ समन्वयक भाग्यश्री गुरसाळे यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. बियाणे गोळे (सीडबॉल्स) बनविण्याची प्रात्यक्षिक उद्यान विभागाचे कर्मऱ्यांमार्फत देण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध पर्यावरण विषयक प्रश्नांना उद्यान अधीक्षक गोरख गोसावी यांनी उत्तरे दिली.टाकाऊ पासून टिकाऊ असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप या निमित्ताने उप आयुक्त घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित संगीत विशारद मंजुषा आर्वीकर व राजीव आर्वीकर यांनी भजन सादर केले. आजच्या कार्यशाळेस उद्यान विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या पर्यावरण दिनी महापालिका विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती उप आयुक्त घोडके यांनी दिली.