महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० एप्रिल) : समाजातील निर्नायकी आणि बेबंदशाहीला आटोक्यात ठेवण्यात पोलिसांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच राज्यात कोणत्याही अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केअर फंडातून मदत पोहोचवली जाते, त्यामुळे सामाजिक जाणीव सदोदित बाळगणाऱ्या आर्यन्स ग्रुपच्या वतीने या दोन्ही निधीच्या वाटपात फूल ना फूलाची पाकळी म्हणून 76 कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आर्यन ग्रुपच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत उद्योजकांनी अशी सामाजिक जाणीव ठेवली तर समाजाच्या अभ्युदयाला वेळ लागणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांच्या हस्ते पोलीस रिलीफ फंडला 25 कोटी तर मुख्यमंत्री केअर फंडला 51 कोटी रुपयांची मदत आर्यन समुहाच्या वतीने देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शंभूराजे देसाई आदी उपस्थित होते.
समाजाचे आपण देणे लागतो. सामाजिक ॠणातून आपण मुक्त व्हायला पाहिजे, ही आर्यन्स ग्रुपची भूमिका आणि विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरून आम्ही हे आमचे योगदान देत आहोत. दोन्ही निधी या समाजाचे भले करणाऱ्या आहेत. त्याची जाणीव आम्हाला असल्यामुळे आम्ही त्यात आमचे योगदान देत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समाजाविषयी कृतज्ञता ठेवावी, ही आपल्या संतांची शिकवण आहे. त्याचे आचरण जगताप परिवार आणि आर्यन ग्रुपच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे समाजाषियी जागरूक असणाऱ्या या समुहाचे मी स्वागत आणि कौतुक करतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुसऱ्याचे ओरबाडून घ्यावे ही विकृती असते तर स्वत:च्या ताटातील घास गरजवंताला देणे ही संस्कृती आहे. आर्यन ग्रुप आणि जगताप परिवाराचे संस्कृती जपण्याच्या वृत्तीबद्दल मी अभिनंदन करतो.
याआधीही आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् संचालित ओमा फाउंडेशन तर्फे पुण्यातील सिग्नल्सवर मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलं होतं. ओमा फाउंडेशन कडून शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटण्यात आले.
यामध्ये पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ओमा फाउंडेशन तर्फे याआधीही या शाळेला आर्थिक मदत करण्यात आली होती. तसेच कोविड काळात रुग्णालयांमध्ये मोफत व्हेंटिलेटर वाटप देखील करण्यात आले होते. यावर्षी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् कडून सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल दयानंद कांबळे हिला आर्थिक मदत करण्यात आली होती. 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावरून भारताचा तिरंगा फडकवण्याचं काजलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.
तर आत्ता आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 कोटी तर गृहमंत्री खात्यास 25 कोटी अशी रोख रक्कम देणगी स्वरूपात दिले आहे. आर्यन्स ग्रुप एव्हिएशन सेक्टर, एज्युकेशन सेक्टर, फायनान्स, हॉस्पिटलीटी, ग्रीन एनर्जी, हेल्थ केअर, गोल्ड रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स, फार्मासिटिकल, हेवी इंडस्ट्रीज, ई-वेहिकल, फुड अँड बेवरेज, मीडिया अँड एंटरटेनमेंट, इंफ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट आणि एग्रीकल्चर अंड ऑरगॅनिक फार्मिंग या क्षेत्रांमध्ये काम करत आहे.