महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ फेब्रुवारी) : अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातील असणारी एकी ते बिघडवू शकले नाहीत. लक्ष्मणभाऊंच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ३१ जानेवारी पासून ७ फेब्रुवारी पर्यंत आहे. काल गुरुवार दि. २ फेब्रुवारी रोजी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबातून त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांनी वेगवेगळ्या वेळी उमेदवारी अर्ज नेल्यामुळे हा कुटुंबातील वाद आहे, असे अनेकांनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न केले. भाजपच्या वतीने या दोहोंपैकी कोणा एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगूनही अनेकांना घरात भांडणे लावण्यात रस वाटत होता.
असे असतानाच आता कुटुंबात होत असलेली चर्चा आदित्य जगताप याने फेसबुकवर टाकली आणि सगळे चिडीप झाले. आपल्या पोस्टमध्ये आदित्य याने एकत्र कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात स्वतः आमदार जगताप, त्यांचे दोन्ही भाऊ विजय, शंकर तसेच त्यांच्या धर्मपत्नी आश्विनीताई, भावजया आणि पुतणे आहेत. आदित्यने त्या फोटोखाली एक पोस्ट लिहीली आहे. त्यात तो म्हणतो, “जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत”.` अत्यंत भावनीक पोस्ट असल्याने आदित्यच्या या मतावर आमदार जगताप समर्थकांनीही ती पोस्ट शेअर आणि लाईक केली आहे. आता या पोस्टचा परिणाम काय होतो, उमेदवारी कोणाला जाहीर होते यासाठी वाट पहावी लागेल.