महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शनिवार दि. ०७ जानेवारी रोजी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. नवी सांगवी- पिंपळे गुरव ग्रामस्थ आणि नागरिकांच्या यांनी ही शोकसभा आयोजित केली होती.
चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप हे अजातशत्रू होते. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकता आणि समाजसेवेचे राजकारण केले. राजकीय जीवनात चिखलफेक होत असते. मात्र लक्ष्मण भाऊंच्या बाबत हे कधीही घडले नाही. ते अजातशत्रू होते. संवाद आणी विचार या अर्थाने ते जीवन जगले. भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड शहराचा विकास घडवून आणणारे नेतृत्व, सगळया लोकांच्या जीवनाशी समरस होऊन विरोधकांनीही त्यांच्याबद्दल गौरवाचे शब्द काढावेत असे निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व आपण गमावले आहे, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा पिंपळे गुरव येथे झाली. शोकसभेला प्रचंड गर्दी होती स्व. लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीने काहींना अश्रू अनावर झाले. यात महिला वर्गाचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.
या सांगवी चा कायापालट करणारे भाऊ आपल्यातून गेले. वज्राहुनही कठीण आणि फुलासारखे कोमल असे भाऊ होते. आमच्या भागात अश्विनी ताईंच्या कोपरा सभा चालू होत्या, यावेळी मी माझ्या नातेवाईकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे ताईंना सांगितले, ताईंनी माझी कैफियत भाऊंना सांगितली, भाऊंनी त्यास जे सहाय्य केले तो मुलगा आज नोकरी करत आहे, ही फक्त भाऊंची कृपा आहे. भाऊंची हीअखंड आरोग्य सेवा भाऊंना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल …!
रामदास पोखरकर, सर
भाऊ आणि माझे १९८६ पासून चे संबंध होते. त्या काळात सुखसुविधा खूप कमी प्रमाणात होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यथित केले, खऱ्या अर्थाने या शहरातील मुकुटमणी मधील हिरा निखळला आहे. त्यांनी सामान्य माणसाला मोठी ताकद देऊन राजकीय क्षेत्रात व्यवसायात नोकरीत मदत केली. असे भाऊ गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढणे हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
राजेंद्र राजापुरे ( मा. सभापती स्थायी समिती )
दुःखद अंतकरणाने जमलेला जनसमुदाय , आज आपल्या सर्वांसाठी खूप अवघड प्रसंग आहे, भाऊ आपल्यात नाही, हे मन मानत नाही. भाऊंनी सुंदर असे पिंपरी चिंचवड शहर घडवले, हे सांगण्याची गरज नाही. मी हजारो लोकांना योगसाधनेचे धडे दिले, परंतु भाऊसारखा योगसाधक होणे नाही.
मीनाताई पवार (योगसाधक)
भाऊंनी आपल्या ३६ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, त्यांची सेवा केली. या कारकिर्दीत तयार झालेला हा योद्धा, मला आलेल्या अडचणीत त्यांनी पाठीवर हात ठेवून पुढे जाण्याचा धीर दिला. काय केले पाहिजे केव्हा केले पाहिजे हे भाऊंनी आम्हाला शिकवले. कर्ज घेऊन घरे बांधलेल्या या सर्वसामान्य नागरिकांना भाऊंनी आधार दिला.
चंद्रकांत आढावा
भाऊंच्या निधनाने आपल्या पिंपरी चिंचवडचा शिल्पकार हरपला आहे. गोरगरिबांचा कैवारी आपल्यातून निघून गेला आहे. ईश्वर भाऊंच्या कुटुंबाला मोठी ताकद देवो!
शामराव पताडे (नवी सांगवी)
याप्रसंगी माजी नगरसेवक शशिकांत कदम, नवनाथ जगताप, राजू लोखंडे, राजेंद्र राजापूरे, राजेंद्र जगताप, अंबरनाथ कांबळे, शिवाजी पाडुळे, संदेश नवले, वैशाली जवळकर, शकुंतला धराडे, उषा मुंडे, माधवी राजापुरे, मीना पवार, महेश जगताप, सागर अंगोळकर, सुरेश सकट, काटे महाराज, बबृहन वाघ महाराज, रामदास पोखरकर सर, संजय जगताप, बाळासाहेब देवकर, शिवाजी कदम, तानाजी जवळकर, सुभाष पवार, राजू नागणे, अमर आदियाल, राहुल जवळकर, नवनाथ देवकर , अंकुश जवळकर, संभाजी ढवळे , शंकरराव गणगे, सुनील कोकाटे, शशिकांत दुधारे, संदीप दरेकर, संजय मराठे, प्रवीण पाटील तसेच सर्वपक्षीय, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.