महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑगस्ट) : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनशे रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिल्लीत १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर सध्या १,१०३ रुपयांना मिळतो, तो आता ९०३ रुपयांना मिळेल. काही राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची घोषणा केली. लोकांवरचा आर्थिक भार कमी करणे हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर ७०३ रुपयांनाच मिळेल. कारण त्यांना दोनशे रुपयांची सवलत दिली जाते. केंद्र सरकारने आणखी ७५ लाख उज्ज्वला योजनेंतर्गत जोडण्या देण्याची घोषणा केली आहे. यासाठी १०.३५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला गेल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत येणाऱ्या काळात निवडणूक आहे. विशेषतः मध्य प्रदेश राज्यात काँग्रेसकडून गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे भाजप सरकारने आधीच दरात कपात केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनुदानात आणखी पडली भर
मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधकांच्या रडारवर आहे. विरोधक मोदी सरकारवर महागाईचा मुद्दा घेऊन टीका करीत असतात. हाच मुद्दा चांद्यापासून बांध्यापर्यंत चर्चीला जात असल्याने मोदी सरकारने पुन्हा एकदा त्यांचे स्वस्ताईचे कार्ड वापरण्यास सुरुवात केली. दरम्यान आज केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात केली असल्याने 8500 रुपये कोटी खर्च करणाऱ्या केंद्र सरकारला आता या दोनशे रुपयांच्या स्वस्ताईमुळे 7500 कोटी रुपये अधिकचे लागणार आहेत.
असे आहेत सध्याचे दर
ऑगस्ट महिन्यात मुंबईत सिलिंडरचे दर 1 हजार 102 रुपये तर पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 129 रुपये एवढे होते. दरम्यान आज केलेल्या दर कपातीनंतर या किंमतीमध्ये तब्बल 200 रुपये कमी लागणार असून, राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे बहिणींसोबतच आता भावांच्या खिशाला बसणाऱ्या चापातून सुटका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.